अनेकांना दादांची भजनं किंवा ठुमरीसारखे वेगवेगळे गायनप्रकार आवडतात. एवढंच नाही, तर नवीन गायकही दादांची भजनं ऐकून त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करतात. पण माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी दादांनी पूर्ण मांडणी केलेले राग ऐकले पाहिजेत. ऐकणाऱ्याची मती गुंग करण्याचं सार्मथ्य दादांच्या रागांच्या या मांडणीत आहे. कुठलाही राग असो, किंवा तो आळवण्याचा समय कुठलाही असो, दादा त्या रागाचा विस्तार असा काही करत, किंवा तो असा काही खुलवत की लगेच त्या रागाला पोषक अशी वातावरणनिमिर्ती व्हायची. त्या रागाचं रूप नि त्याचा समय लख्खपणे समोर उभा ठाकायचा. हे सारं दादांनी मोठ्या मेहनतीनं मिळवलं होतं आणि पचवलंही होतं. कुठल्याही गोष्टीसाठी खरोखरच श्रम घेतले असतील, तर ते तुमच्या कलेत-कामात दिसतात. दादांनी गाणं शिकण्यासाठी घेतलेले श्रम त्यांच्या गाण्यातून असे ठायीठायी प्रकट व्हायचे. दादांनी संगीतासाठी केलेली साधना अशी ऊर्जस्वल होती. त्यामुळेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं नाव जगात कुणी विख्यात केलं असेल, तर ते भीमसेनदादांनी असं माझं मत आहे. किंबहुना एकूणच शास्त्रीय संगीत रसिकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि ते कुणालाही नाकारता येणार नाही.
महत्त्वाचं म्हणजे संगीत हा दादा आणि मला जोडणारा दुवा होताच, पण त्या व्यतिरिक्त अजून एक बंध आमच्या दोघांत होता. तो म्हणजे माझे गुरू राघवेंद स्वामी हे त्यांचं कुलदैवत होतं. संगीताबरोबरच या आध्यात्मिक धाग्यानंही आम्ही बांधले गेलो होतो. म्हणूनच त्या अर्थानंही ते माझे दादा होते.
पण आता भीमसेनदादा नाही, याची खंत मनात कायम राहील.
No comments:
Post a Comment