विख्यात गायिका किशोरीताई आमोणकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा स्वराभिषेक सोहळा पुण्यात आयोजिण्यात आला आहे. १२ व १३ फेब्रुवारीला होणाऱ्या या स्वरमैफलीत सगळी वाद्यं आणि जास्तीत जास्त घराण्यांची गायकी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ४० वर्षांपेक्षा जास्त काळ संगीतसेवा केलेले दिग्गज तसेच आजच्या पिढीतील दमदार गानताऱ्यांचा सहभाग- हा या कार्यक्रमाचा विशेष असेल. या वेगळ्या संगीतसोहळ्यानिमित्ताने..
१९ ९१ च्या फेब्रुवारीतली एक दुपार. तीन वाजताच मिट्ट काळोख पसरलेला. बर्फाच्या परावर्तित प्रकाशात सुस्तावलेले न्यूयॉर्कचे उभे-आडवे आखीव रस्ते. आमीरखाँसाहेबांचा मारवा ऐकत, वंशभेदावरच्या एका केसवर काम करत बसलेली शनिवार पेठेतली मी. दारावर टकटक करून आत आलेल्या माझ्या बॉसच्या डोळ्यात एक विखार होता.. ‘‘तू ऐकत असतेस त्यातली एक टेप देतेस का?’’ कपाटातल्या ४०-५० टेप्सवरून मी नजर फिरवीत असतानाच माईक त्याच्या अमेरिकन उच्चारात म्हणाला, ‘‘सहेला रे.. ती दे.’’ टेप घेऊन ज्या त्वरेने तो स्वत:च्या केबिनमध्ये शिरला त्यावरून काहीतरी मोठं घडलं असल्याची जाणीव झाली. पुढचे तीन तास त्याच्या दारावरची ‘DO NOT DISTURB’ ची पाटी पाहून आमच्या लॉ फर्ममधले आम्ही सगळे चुळबुळ करत राहिलो. एरवी माझ्या केबिनमधून येणारे भारतीय शास्त्रीय संगीताचे सूर आज बॉसच्या केबिनमधून येत होते, याचंही सगळ्यांना आश्चर्य वाटत राहिलं. ‘‘कोणाचं गाणं ऐकतोय तो?’’, ‘‘एवढं काय विशेष आहे त्यात?’’ अशा प्रश्नांना- ‘‘किशोरी आमोणकर.. her voice is just divine. She has a mind of an eccentric genius.....’’ अशी जुजबी उत्तरं दिल्याचं अस्पष्ट आठवतं.
पण आज वीस वर्षांनंतरही किशोरीताईंच्या गाण्याविषयी नेमकी उत्तरं देता येतीलसं वाटत नाही. दैवी आवाजातलं आर्जव, विव्हल करणारे आर्त सूर, वेदनेच्या कडा ओलांडून ओघळणाऱ्या अश्रूंना वाट करून देणारे आलाप, भावनेमध्ये चिंब करणारी तान.. अशा कितीतरी विशेषणांचा वापर करूनही ताईंचं गाणं अस्पर्शीच राहतं. शब्द, त्यांचा अर्थ, भारतीय शास्त्रीय संगीताचं व्याकरण यातलं काहीच माहीत नसूनही माईकला भिडत होती ती ताईंच्या अवीट आवाजातली विव्हलता! पाणावलेले डोळे पुसत ''Her music is so cathartic!'' असं म्हणून माईक निघून गेला. त्याच्या चार वर्षांच्या मुलीला दुर्धर रोग झाल्याचं डॉक्टरचं निदान आणि गेली सात र्वष लढवत असलेल्या अतिशय मोठय़ा खटल्यामध्ये त्याच्याविरुद्ध गेलेला न्यायाधीशाचा निर्णय- असे दोन्ही कागद त्याच्या टेबलावर निपचित पडले होते. ‘सहेला रे’ मात्र माईक स्वत:सोबत घेऊन गेला होता.
ताईंच्या २०-२२ मिनिटांच्या या भूपच्या स्वरचित बंदिशीतून जे भाव श्रोते मिळवतात, ते वेगवेगळे आणि ऐकणाऱ्याच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून असतात. काहींना ‘सहेला रे’ एक आनंददायी अनुभव वाटतो, काहींना तो समूळ विकल करून जातो, तर काहींना त्यामध्ये भक्तीच्या ध्यानात्मक रंगाची प्रचीती येते. काहींना त्या बंदिशीचे लाघवी शब्द मोहवतात. प्रियकराला साद घालण्यासाठी वापरलेला ‘सहेला’ हा शब्दही आवडतो. माझ्यापुरती मी एक समजूत करून घेतली होती. जेव्हा जवळजवळ सात-आठ र्वष ताईंचा आवाज त्यांच्यावर रुसला होता. आणि जेव्हा त्या गाऊशकत नव्हत्या तेव्हा त्या श्रोत्यांपासून दूर राहिल्या होत्या. त्या न संपणाऱ्या काळरात्रीनंतर गायलेली ताईंची ही पहिलीच ध्वनिमुद्रिका होती. त्या आठ वर्षांच्या अबोल्यानंतर ताईंनी श्रोत्यांबरोबर साधलेला हा पहिला संवाद आपणा सगळ्यांनाच विद्ध करून गेला होता. ताई मागे कधीतरी एकदा म्हणाल्याचं आठवतं.. ‘‘सहेला रे ही एक साद आहे. विरहाची यातना भोगलेल्या विरहिणीचं ‘अबके मिले तो बिछड न जाये’ असं म्हणतानाचं आर्जव सुरांतून उमटलंच पाहिजे. डोळे बंद होते तेव्हा तू होतास, आता डोळे उघडल्यावर मात्र नाहीस.. यातली घालमेल त्यामध्ये अभिव्यक्त व्हायला हवी. शिवाय भूप म्हणजे राजा. त्याच्या प्रजेवरचं त्याचं प्रेमही त्यात उतरायला हवं. त्यातला धैवत लॅबर्नमच्या फुलासारखा खाली ओघळणाराच हवा.’’ हे सारे विचार ताईंनी अमूर्त पद्धतीने भावसातत्य जपत श्रोत्यांपर्यंत नक्कीच पोहोचविले. त्यामुळेच असेल कदाचित, ध्वनिमुद्रिका बाजारात आल्यापासून ४० वर्षांनी पहिल्यांदाच ऐकणाऱ्या नव्या श्रोत्यालाही ‘सहेला रे’ तितकाच भावतो आणि पकडून ठेवतो.
मला या बंदिशीमध्ये विलीन होण्यासाठीचं आसुसलेपण, काकुळतीने प्रियाला विनवणी करतानाची हुरहुर या सगळ्या छटा दिसत राहतात. सुरांचा अचूकपणा साधूनसुद्धा ताईंनी ‘भईलवा’ म्हणताना साधलेला मुलायम लवचिकपणा आजही थक्क करतो. शिष्य म्हणून ताईंचा २०-२२ वर्षांचा सहवास लाभलेला रघुनंदन पणशीकर एकदा म्हणाला होता, ‘‘ताईंमध्ये ‘आईपण’ इतकं भरलेलं आहे, की ते त्यांच्या गाण्यातून थेट संक्रमित होतं. वात्सल्य, ममत्व, करुणा अशा प्रेमाच्या अनेक छटा त्यांच्या सुरांतून पाझरत असतात. त्यात आपल्याला चिंब व्हायला होतं.’’ ताईंना थोडंफार जवळून ओळखणाऱ्या लोकांना रघूचं हे स्पष्टीकरण पटेल. काटेरी कवचाच्या आतल्या ताईंचा मृदु ओलावा त्यांच्या गाण्यातून आपल्याला अपरिमित मिळत राहतो, हेही मान्य होईल.
‘सहेला रे’च्या आठवणींना उजाळा देताना त्या भूपावर झालेली टीकाही आठवते. ‘तो भूप वाटत नाही, पहाडीच वाटतो’, ‘भूप हा प्राथमिक राग आहे, तो काय मैफिलीत गायचा राग आहे का?’, ‘कसला धैवत लावते? देसकाराचा आहे तो धैवत!’ .. या आणि अशा टीकेला ताईंनी कधीच जुमानलं नाही. प्रखर निष्ठेनं गाणं आणि तेवढय़ाच तडफेनं ताईंनी स्वत:चं आयुष्य प्रवाहित ठेवलेलं आहे. एकूणच संगीताविषयी गेल्या १५-२० वर्षांत त्यांचा विचार बदललेला आहे. स्वत:च्या गाण्यात झालेल्या फरकाची त्यांना जाणीव आहे. माध्यमाच्या अचूकतेपेक्षा रसभावप्रणीत गाणं ताईंनी अलीकडे जवळ केलं आहे. ‘सहेला रे’विषयी आता विचारलं तर ताई कदाचित गोड हसून म्हणतील, ‘वीस मिनिटांत राग मांडता येतो का? तासभर आळवलं तरी माझा स्वयंभू गंधार मला कधी सापडेल, याची शाश्वती नाही. छोटय़ाशा बंदिशीत राग बांधायचा असेल तर शास्त्रीय संगीत गाऊ नका, सुगम संगीतच गा ना!’ हे शेवटचं वाक्य संपता संपता ताईंची नाराजी उफाळून आली असेल.
वर उल्लेख केलेल्या टीकेसोबत आणखी एक आक्षेप ताईंच्या भूपासंबंधी घेतला गेला होता- ‘हे काय जयपूर घराण्याचं गाणं आहे?’ अलीकडेच लिहिलेल्या ‘स्वरार्थरमणी’च्या संदर्भात बोलताना ताईंनी या आक्षेपाचं खंडन केलं आहे. ‘वाराणसीला गेल्यावर गंगेच्या विस्ताराने मी इतकी भारावले, की देवघरातल्या छोटय़ाशा लोटीतलं रोज पूजत असलेलं गंगाजल मला अपुरेपणाची जाणीव देऊन गेलं. आमच्या संगीताचं असंच आहे. हे घराणं, ते घराणं, आमची पद्धत, तुमची शिस्त अशा सगळ्या व्यूहापलीकडच्या संगीताच्या व्याप्तीचा, खोलीचा आम्हाला विसर पडला आहे. घराणेबद्ध शिस्तीबाहेर, माध्यमाच्या व्याकरणापलीकडे रागाच्या सुरांना काही व्यक्त करायचं असतं. ते काय आहे, याचा ध्यास मला गेली कित्येक र्वष लागलेला आहे. ‘मी’ व्यक्त होणं संपलं की मग रागाचं वैश्विक रूप दिसेल, खरा रागभाव उमटत राहील आणि तोच चिरंतन असेल.’’ या बोलण्यातली निस्सीम श्रद्धा माझ्यापर्यंत पोहोचत असली तरी त्याचवेळी अनेक प्रश्नही माझ्यावर कुरघोडी करत राहिले. ताईंची प्रत्येक सुरावरची हुकूमत पटवणारं त्यांचं गाणं, विचार आणि चिंतनातून आलेलं असतं, की स्वयंप्रेरित, स्वयंस्फूर्त असतं? संगीताच्या अमूर्त अभिव्यक्तीला स्थायी, अढळ रूप कसं असू शकेल? स्वरांच्या विशिष्ट रचनेतून व्यक्त होणाऱ्या भावाला वस्तुनिष्ठ रूप असतं का? तसं असेल तर वेगवेगळ्या घराण्यांच्या शैलीतून साकारलेल्या स्वराकृतींमधून नित्यनूतन अनुभूती कशी मिळते?
कलावंताच्या प्रतिभेचं आणि कलाप्रक्रियेचं असं विच्छेदन करणं, हा या लेखाचा उद्देश नाही. ताईंच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मी आणि अमोल पालेकरांनी आयोजिलेल्या स्वराभिषेक सोहळ्याला सर्व संगीतप्रेमींना निमंत्रण द्यायचं आहे. म्हणून ‘सहेला रे’च्या निमित्ताने..
येत्या १२ आणि १३ फेब्रुवारीला पुण्यातल्या गणेश कला-क्रीडा मंच येथे एका वेगळ्या धाटणीची मैफील आखली आहे. या स्वराभिषेकात सगळी वाद्यं आणि जास्तीत जास्त घराण्यांची गायकी समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ४० वर्षांपेक्षा जास्त संगीतसेवा केलेले दिग्गज आणि आजच्या पिढीतले देदिप्यमान तारे अशा सर्व कलावंतांचा सहभाग हा या कार्यक्रमाचा विशेष असेल. उस्ताद अमजद अली खाँच्या सरोदवादनाने सुरुवात होणारी १२ तारखेची संध्याकाळ किशोरीताईंच्या गायनाने तृप्त होईल. ‘क्वचित ऐकलेला किंवा अलीकडे तुमच्याकडून न ऐकलेला एखादा राग गाल का?’ या आमच्या आग्रहाला ताईंनी मन:पूर्वक होकार दिला आहे. या दोन बुजुर्ग कलाकारांमध्ये धृपद शैली सादर केली जाईल. उस्ताद बहाऊद्दीन डागर रुद्रवीणेवर, तर नॅन्सी कुलकर्णी चेलो या पाश्चात्त्य वाद्यावर उदय भवाळकरांबरोबर जुगलबंदी करतील. हा आगळा मिलाफ खर्जाची विविध रूपं समोर आणेल. माणिक मुंडे यांची पखवाजावरची समर्थ साथ या तिन्ही कलावंतांना बांधून ठेवेल.
एकच राग वेगवेगळ्या घराण्यांतून कसा अभिव्यक्त होतो; घराणेबद्ध शैलीतूनही रागाचं मूळ रूपच समोर येतं का, हे पडताळून पाहण्याचा एक अभिनव प्रयोग आम्ही १३ फेब्रुवारीच्या दोन सत्रांत करून पाहणार आहोत. नंदिनी बेडेकर, कलापिनी कोमकली आणि कौशिकी चक्रवर्ती या आजच्या आघाडीच्या गायिका आपापल्या शैलीतून सकाळचा प्रहर साजरा करतील. कुमारजींची अनन्यसाधारण गायकी, जयपूर अत्रौली घराण्याचं ‘आ’काराच्या आलापीचं गाणं आणि पतियाळा घराण्याचं आक्रमक गायन यांतून एकाच रागाचा विस्तार केला जाईल. तसंच संध्याकाळच्या सत्रात जयतीर्थ मेवुंडी किराणा घराण्याच्या शैलीत, रघुनंदन पणशीकर जयपूर अत्रौली घराण्याच्या शिस्तीत आणि उस्ताद राशीद खाँचे शिष्य प्रसाद खापर्डे रामपूर घराण्याच्या परंपरेनुसार यमनाचं अभिजात रूप आपल्यासमोर मांडतील.
सतार, संतूर आणि बासरी या तिन्ही भिन्न पोताच्या वाद्यांतून माध्यान्हीचा राग साकार होईल. मंजू मेहता, सतीश व्यास आणि राकेश चौरासिया यांच्यासारखे ज्येष्ठ वादक एकमेकांच्या वादनाला नवी उंची गाठून देतील. तसंच कर्नाटक शैलीमधलं गायन आणि व्हायोलिन अशी जुगलबंदी सादर करणारे टी. एम. कृष्णा आणि श्रीरामकुमार हे अतिशय नामवंत कलाकार पुणेकर रसिकांना मोहवून टाकतील.
या स्वराभिषेक सोहळ्याची यथार्थ सांगता करणारा ‘तालकचेरी’चा कार्यक्रम, ‘वाद्यवृंद’ या संकल्पनेचा वेगळा थाट समोर आणेल. पद्मविभूषण विकू विनायकराम यांचं घटम्वरचं प्रभुत्व, सेल्वा गणेश यांचं खंजिरीवरचं नादकौशल्य आणि महेश विनायक यांची विलक्षण गायकी.. या तिघांची जुगलबंदी सगळ्या संगीतप्रेमींना अविस्मरणीय नजराणा ठरेल. सर्वाचे लाडके उस्ताद झाकीर हुसेन पुन्हा एकदा आपली तबल्यावरची हुकमत पंडित भवानीशंकरांच्या पखवाजासोबत सिद्ध करतील. या महारथींना पूरक साथ देतील- सुलतान खाँ साहेबांचे चिरंजीव आणि शिष्य साबीर खाँ!
किशोरीताईंनी साठ वर्षांहून अधिक काळ श्रोत्यांवर अभिजात सुरांची उधळण केली आहे. त्या सर्व तृप्त क्षणांसाठी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देशभरातल्या संगीतप्रेमींना ‘सहेला रे’च्या निमित्ताने मिळेल. वर उल्लेख केलेले सर्व कलावंत आणि आपण सगळे मिळून ताईंना दीर्घायुष्यासाठी सदिच्छा अर्पण करूया.. या स्वरार्थरमणीच्या अथक तपश्चर्येला नम्र अभिवादन करूया.
No comments:
Post a Comment