Search This Blog

Thursday, February 10, 2011

संगीत हा त्यांचा ध्यास!- लतादीदी

संगीत हा त्यांचा ध्यास!- लतादीदी >> लता मंगेशकर


पंडितजींना मी अण्णा म्हणत असे. अण्णांबरोबर गाण्यासाठी मला संगीतकार श्ाीनिवास खळेंनी बोलवून घेतलं. मी तेव्हा अक्षरश: घाबरून गेले होते. इतक्या मोठ्या उंचीच्या गायकाबरोबर गायचं या कल्पनेने माझे हातपाय कापत होते. मी खळेंना सांगितलं, कुठे मी आणि कुठे पंडितजी? तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी घ्या. पण . मीच गायला हवं, असा हट्ट खळेंनी धरला. माझी भीती काही जाईना. मग मी अण्णांनाच भेटले आणि त्यांना माझी अवस्था सांगितली. अण्णा म्हणाले, तू अजिबात काळजी करू नकोस. कोणाबरोबर गाते आहेस, हे मनातही आणू नकोस. तरीही गायला सुरुवात करताना मनात भीती होतीच. पण पुढे इतकं सोपं वाटायला लागलं की मी किशोर, रफी यांच्याबरोबर ज्या सहजतेने गायचे तशीच गायला लागले. हे केवळ अण्णांच्या त्या वागणुकीमुळेच शक्य झालं. इतका हा विलक्षण माणूस की, मला माझे वडीलच मिळाल्यासारखं वाटलं.

कधी कधी ते रात्री साडे दहा-अकरा वाजता मला फोन करत. असाच एकदा रात्री अकरा वाजता त्यांचा फोन आला. मी विचारलं, अण्णा एवढ्या रात्रीचा का फोन केलात? त्यावर म्हणाले, मी कार्यक्रमासाठी नागपुरात आलो आहे. पण आता मी तुला तुझ्या वडिलांचं गाणं गाऊन दाखवणार आहे. असं म्हणून त्यांनी 'शूरा मी वंदिले' हे बाबांचं गाणं ते जसे गायचे तसं ऐकवलं. फोनवर गाऊन दाखवलं.

एकदा ते मुंबईत आले असताना मला अचानक फोन आला, 'लता आज मी तुझ्या घरी येऊन जेवणार आहे. काय करशील?' मी विचारात पडले, एवढा मोठा माणूस घरी येतो आहे. त्याच्यासाठी काय जेवण करावं? मग तेच फोनवरून बोलले, 'तू घाबरली असशील. मला जास्त काही नको. फक्त श्रीखंड-पुरी कर.' ते घरी आले. जेवले आणि नंतर गात बसले. त्यांची गायकी थोर होतीच, तिच्याबद्दल सगळेच सांगतील. पण ते माणूस म्हणूनही तितकेच थोर होते, याचा अनुभव मी घेतलाय.

ज्यावेळी पंडितजींना विशेष नाव नव्हतं त्या सुरुवातीच्या काळात आमचे चित्रपट क्षेत्रातले मोठे साऊंड रेकॉडिर्स्ट मिनू कात्रक मला म्हणाले, 'अगं भीमसेन नावाचा एक मुलगा आलाय, तो फार चांगलं गातो. त्याला फिल्ममध्ये काम मिळालं पाहिजे.' त्यानंतर मला कळलं की, संगीतकार शंकर-जयकिशन यांनी त्या मुलाला 'बसंत-बहार' चित्रपटासाठी गायला बोलावलं आहे. मी त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला गेले. ती हीरो आणि एका गायकामधली जुगलबंदी होती. त्यात हीरो जिंकतो. हीरोसाठी मन्ना डे प्लेबॅक देणार होते. हरणाऱ्या गायकासाठी पंडितजी गाणार होते. 'केतकी जुही गुलाब चंपा बन भुले' असे त्या गाण्याचे शब्द होते. पंडितजी तुफान गायले. त्यांना ऐकून या गायकापुढे हीरो जिंकतो, ही कल्पनाच मला करवेना. रेकॉर्डिंग संपल्यावर शंकर-जयकिशन पंडितजींना म्हणाले, 'सिच्युएशनही ऐसी है के हीरो जितता है. हमे माफ करना.' त्यावर पंडितजी हसले आणि काही हरकत नाही, असं म्हणाले.

अण्णा अखंड संगीतातच रमलेले असायचे. मी त्यांच्या घरी पुण्याला जायचे तेव्हा चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत हाच विषय असायचा. मग कधीतरी विषय बदलून गाण्याच्या पदार्थांवर येई. संगीत हा त्यांचा ध्यास होता. त्यांना सुरुवातीच्या काळात अमीर खां साहेबांकडे गाणं शिकायचं होतं, पण खांसाहेब तयार होईनात तेव्हा एकदा ते खांसाहेबांच्या गाडीपुढेच झोपल्याची आठवण सांगितली जाते. यातून त्यांची तळमळच दिसून येते. पंडितजी खरे गात.

त्यांच्या अन्य आवडीच्या गोष्टींमध्ये गाड्यांचा समावेश करावा लागेल. वेगवेगळ्या गाड्या चालवणं त्यांना आवडायचं. त्यांना फास्ट ड्रायव्हिंगची आवड होती. माझ्या वडिलांच्या एका पुण्यतिथीला ते गायला येणार होते. त्याच्याआधी एक मैफल संपवून ते येणार होते. तो कार्यक्रम खूपच दूर होता. पंडितजींनी तो संपवला आणि स्वत: ड्रायव्हिंग करून मुंबईत पोचले. आल्यावर मला म्हणाले, इथे पाणी कुठे आहे ते मला सांग. नळाखाली उभं राहून थंड पाण्याची धार त्यांनी डोक्यावर घेतली. बराचवेळ नळाखाली उभे राहिले. मग गायला बसले. तासभर ते मनसोक्त गात होते. आम्ही कुठे विमानाने गेलो तरी कार्यक्रमाच्या आधी एक दिवस विश्रांती घेतो. इथे तर आधीच्या मैफलीत दोन-तीन तास गाऊन आल्यावर पंडितजी जराही विश्रांती न घेता पुन्हा गात होते. मी या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही.

इतक्या उत्तुंग प्रतिभेचा माणूस आज आपल्यात नाही. स्वरभास्कराचा खरोखरच अस्त झाला आहे.

No comments:

Post a Comment