पहिल्यापासून मी भीमसेनजींना दादाच म्हणायचे. कारण संगीताच्या क्षेत्रात त्यांचं नाव गाजायला लागलं, तेव्हा मी कॉलेजात शिकत होते. पण माईकडे (मोगुबाई कुर्डीकर) गाणं शिकल्यावर त्यांनी माझ्या गाण्याचं कौतुकही केलं होतं. ते कौतुक करतानाच 'तुझ्या गुरूचं तप:पूत गाणं आता तुला पुढे न्यायचंय' अशी जबाबदारीची आठवणही मला करून दिली होती. त्यांना त्यांच्या गुरूबद्दल, म्हणजे सवाईगंधर्व रामभाऊ कुं दगोळकर यांच्याबद्दल नितांत प्रेम आणि आदर होता. तसंच त्यांची आपल्या गुरूवर प्रचंड श्रद्धा होती. तशीच श्रद्धा माझी माझ्या गुरूंवर आहे. त्यामुळे ही श्रद्धा हाही आम्हा दोघांना जोडणारा एक दुवाच होता, असं मला वाटतं.
आम्ही वेगवेगळ्या घराण्याचे, म्हणजे ते किराना घराण्याचे आणि मी जयपूर घराण्याची; त्यामुळे आम्ही एकमेकांबद्दल काय बोलतो, याविषयी अनेकांना कुतूहल! पण माझं स्पष्ट मत आहे की, संगीताची घराणी ही नंतर, त्याआधी सात स्वर आहेत. म्हणजे आमची घराणी वेगळी असली, तरी आम्हा सगळ्या गायकांना एकत्र बांधणारे स्वर सारखेच आहेत.
No comments:
Post a Comment