.................
' जो भजे हरी को सदा' ... पलीकडच्या खोलीत कोणी तरी भीमसेनजींची टेप लावली होती. पुन: पुन्हा ऐकलं तरी पुन्हा ऐकावंसं वाटणारं हे भजन. जवळजवळ प्रत्येक मैफिलीत भीमसेनजींना या भजनाची फर्माईश होत असते. अशी ही काही भजनं, अभंग तसेच काही रागही भीमसेनमय होऊन गेलेत. एखादा कलाकार आपल्या कलेवर प्रभुत्व मिळवतो, तेव्हा कलाकार आणि कला एकरूप झालेली असतात हेच खरं!
भीमसेनजी मला प्रथम आठवतात ते माझे गुरू सुरेशबाबू यांच्या पाठीमागे तंबोऱ्यावर बसलेले. हिराबाईंच्या घरी त्यांचं अधूनमधून जाणं असायचं. पण आमची क्वचितच भेट व्हायची. त्यामुळे म्हणण्यासारखा परिचय झाला नव्हता. १९५९साली आकाशवाणीतल्या नोकरीच्या निमित्ताने मी पुणं सोडलं. तोपर्यंत भीमसेनजींचा पुण्यात चांगलाच जम बसला होता. सर्वदूर त्यांचं नाव होऊ लागलं होतं.
भीमसेनजींकडून दाद
भीमसेनजींची पत्नी वत्सला माझी गुरूभगिनी. तिचं लग्न होण्याअगोदर आमच्या बरोचदा भेटी होत असत. आम्ही एकमेकांच्या घरी जायचो. वत्सलाची आई प्रेमानं माझ्या गाण्याबद्दल चौकशी करायची, कौतुक करायची. वत्सलाच्या लग्नानंतर आमच्या भेटी कमी झाल्या. भीमसेनजी मात्र अधूनमधून संमेलन- महोथअशआथ भेटायचे. पण ही भेट ओझरती. रंगमंचावर जाण्यापूवीर् किंवा तंबोरे लावत असताना.
भीमसेनजींनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या मुंजीत मला गायला बोलावलं, तेव्हा मला खूप आनंद झाला. एक तर एका मोठ्या कलाकारानं मला बोलावलं होतं आणि दुसरं म्हणजे या कार्यक्रमाला पुण्यातले खास ददीर् उपस्थित राहणार होते. किराणा घराण्यात माझं संगीताचं शिक्षण सुरू होण्यापूवीर्च माझी ठुमरी बडे गुलाम अली खाँसाहेब आणि बेगम अख्तर यांच्या रेकॉर्ड्सच्या सान्निध्यात वाढली होती. तिचा बोलबालाही झाला होता. त्यामुळे किराण्याच्या ठुमरीहून अगदी वेगळी अशी उत्तरेकडची वाट तिने धरली होती. सुरेशबाबूंची ठुमरी अनेकदा पंजाबी अंगानं वावरायची. पण तरीही किराण्याशी आपलं नातं तिनं तोडलं नव्हतं. पुणं सोडल्यावर माझ्या ख्याल गायकीनं मात्र नवं वळण घेतलं होतं. अमीर खाँसाहेबांची गायकी, त्यांची सरगम डोळसपणे माझ्या गाण्यात शिरली होती. या बदलाचं स्वागत कसं होईल, माहीत नव्हतं. थोडंसं दडपणही आलं होतं. भीमसेनजी समोर बसून गाणं ऐकत होते. दाद देत होते. माझं खूप कौतुक झालं. या मैफिलीला आलेले वसंतराव देशपांडे नंतर जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा या मैफिलीबद्दल बोलायचे. 'पोरीनं आपलं गाणं छान बसवलंय,' असं म्हणायचे. भीमसेनजी, अमीर खाँसाहेब आणि बडे गुलाम अली खाँसाहेब या दोघांचे चाहते आहेत, हे मला नंतर समजलं.
गायकाची सारी करामत त्याच्या गळ्यावर अवलंबून असते. गाणं नुसतं डोक्यात असून चालत नाही. तेवढ्याच ताकदीनं ते गळ्यातून बाहेर पडावं लागतं. नैसगिर्क देणगीबरोबरच पराकोटीची साधनाही लागते. नशिबाची साथ तर लागतेच.
श्रोत्याला भावणारा आवाज
भीमसेनजी खरंच भाग्यवान! या वयातही त्यांचा आवाज एखादा प्रकाशाचा झोत चहूबाजूंनी अंगावर यावा, तसा श्रोत्याला भारावून टाकतो. साऱ्या वातावरणात भरून राहतो. या आवाजात जबरदस्त 'मास अपील' आहे. किराणा गायकांचे आवाज साधारणपणे बारीक, टोकदार, उंच पट्टीचे. भीमसेनजींचा आवाज या आवाजापेक्षा किती तरी वेगळा रुंद, धुमारदार, पीळदार, लांब पल्ल्याचा, दमसास पेलणारा. सुरेलपणा, स्वरांची आस राहाणं, त्यामधील गोडवा वगैरे- किराण्याची इतर वैशिष्ट्यं त्यात आहेतच. आवाज लहान-मोठा करता येणं हे परिणाम साधण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. आवाज बारीक करून भीमसेनजी जेव्हा तार षड्ज लांबवतात किंवा तान घेतात, तेव्हा श्रोत्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. अनेकदा अशा वेळी टाळ्याही पडतात.
कन्नड भाषेचा तसंच कर्नाटक संगीताचा किराणा घराण्याशी फार जवळचा संबंध आहे. हे भीमसेनजींच्या आवाजातून, गाण्यातून अनेकदा जाणवतं. त्यांच्या मराठी बोलण्याला जसा एक गोड कानडी हेल आहे, तसाच त्यांच्या गाण्यातल्या काही जागा, हरकती कर्नाटकी लकबीनं येतात, त्या वेगळा आनंद देऊन जातात.
अलंकृत, बोलकी गायकी
कोणतीही गायकी जन्माला येते, तेव्हा ती 'परिपूर्ण' नसते. हळूहळू ती 'परिपक्व' होत राहते. परिपक्व होत राहणं ही तिची निरंतरची गरज असते. परिपूर्णतेला अंत नसतो हे प्रतिभावान कलाकार जाणून असतो. म्हणूनच आज बहुतेक सर्व घराण्यांच्या गायकीमध्ये बदल झालेले दिसतात आणि ते अपरिहार्य आहेत. अब्दुल करीम खाँसाहेबांच्या गायकीशी निगडित झालेल्या किराणा गायकीला नंतरच्या पिढीतील गायक- गायिकांनी समृद्ध करीत खूप खूप दूर नेलं आहे, याची कित्येकांनी अजून दखल घेतलेली दिसत नाही. किराणा आणि विशिष्ट आवाज लावण्याची पद्धत असं आता म्हणता येत नाही. संथ स्वरविलासातील विविधता, अतिचपळ दाणेदार ताना, बंदिशीतील बोलांचा वापर, सरगमचा समावेश, मांडणीमध्ये नम्र भावाबरोबरच अधेमधे जोशपूर्ण आवेश आणि हे सर्व करीत असता गरज भासेल तिथे लयीशी सलगी असे किराण्याच्या अतिशय भावनाप्रधान व्यक्तित्वाला शोभून दिसणारे नवे नवे अलंकार घालून ही गायकी श्रोत्यांशी संवाद साधते आहे. त्यांना अविनाशी आनंदात भिजवून टाकते आहे. भीमसेनजींच्या गाण्यात हे बदल प्रकर्षाने जाणवतात.
कोणत्याही कलेचं गणित मांडता येत नाही आणि ते तसं मांडायचंही नसतं. किराणा घराण्यात अमकं नाही आणि तमकं नाही, असा आरोप करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात टोकाची स्पर्धा चालली असताना किराणा घराणं टिकून राहिलंय. एवढंच नाही, तर सामान्यांपासून जाणकारापर्यंत ते अतिशय लोकप्रियही आहे. मान्यताप्राप्त आहे. तिथे दिपवून टाकण्यासारखं काही नसलं तरी समाधीपर्यंत नेण्याची ताकद आहे.
मैफिलींचे बादशहा
प्रत्यक्ष मंचावर बसून कलाकार काय करतो, त्याला कशी, किती वेळा उत्स्फूर्त दाद मिळते, श्रोते शेवटपर्यंत टिकून राहतात की नाही, अशा गोष्टींवर मैफिलींचं यश अवलंबून असतं आणि मैफिलीतच संगीत कलेची जोपासना होत आली आहे. भीमसेनजी मैफिलींचे बादशहा आहेत. त्यांची मैफील म्हणजे श्रोत्यांची तुडुंब गदीर् आणि वाहवांची खैरात. किराणा गायकीला नवीन जीवनसत्त्व देऊन तिचं आयुष्य वाढवण्यात, तिला सुदृढ करण्यात भीमसेनजींचा मोठा वाटा आहे.
एकदा एचएमव्ही स्टुडिओत भीमसेनजींचं रेकॉर्डिंग होतं. थोडा वेळ रेकॉर्डिंग ऐकावं आणि भीमसेनजी आणि वत्सलाला भेटूनही यावं म्हणून मी गेले होते. वत्सलाचं एक वाक्य मला अजून आठवतं. 'शरीर आणि आवाज ताब्यात आहे तोवर भराभर रेकॉर्डिंग्ज करायला हवीत.' हे सूत्र धरून भीमसेनजी रेकॉर्डिंग करीत राहिले, हे फार चांगलं झालं. आज त्यांच्या अनेक कॅसेट्स उपलब्ध आहेत. त्या घरोघरी पोहोचल्या आहेत. अभंगवाणीने भीमसेनजींना विलक्षण लोकप्रियता मिळवून दिली. रागसंगीताचा साज चढवून गायलेली मराठी, हिंदी, कन्नड, भक्तिगीतं सामान्यापासून जाणकारांच्या मनात घोळत राहिली. आकाशवाणी, दूरदर्शन यासारख्या प्रचार-प्रसारमाध्यमांबरोबर चित्रपटासारख्या झगमगत्या माध्यमालाही भीमसेनजींनी आपलेपणानं जवळ केल्यामुळे रसिकांच्या मनातून त्यांचं नावं कधी पुसलंच गेलं नाही. भीमसेनजींच्या या कलाप्रवासात आणि व्यवसायात वत्सलाचा मोठा सहभाग आहे.
सरस्वती आणि लक्ष्मी
सरस्वती आणि भाग्यलक्ष्मी या दोघींनीही भीमसेनजींना भरभरून दिलं, देत आहेत. लोकमान्यतेबरोबर सरकारी दरबारी, भारतात- परदेशात, त्यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. भीमसेनजींसारखाच 'भीमसेनी' लोकप्रियता मिळवणारा शास्त्रीय-संगीत गायक एखादाच.
एकदा 'स्त्री' मासिकानं मला भीमसेनजींची मुलाखत घ्यायला सांगितलं. स्त्री आणि पुरुष गायक यांच्याबद्दल ही चर्चा होणार होती. भीमसेनजी मराठी बोलतात त्यातला कानडी हेल ऐकताना फार छान वाटतो. तासभर आम्ही बोलत बसलो होतो. किराणा घराण्यातले बहुतेक सर्वच कलाकार विनम्र आहेत, अगत्यशील आहेत. आढ्यताखोर नाहीत, आत्मप्रौढी मिरवणारे नाहीत, पण स्वाभिमानी आहेत. दुसऱ्या कलाकाराबद्दल वाईट बोलणारे नाहीत. उलट त्यांच्यातल्या लहान गुणांचंही कौतुक करणारे आहेत हे आमच्या चर्चेत मला पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणवलं.
भीमसेनजींनी घरी जेवायला यावं, अशी माझी खूप दिवसांची इच्छा होती. एकदा त्यांची सकाळची मैफील होती. मैफिलीनंतर जेवायला यायचं त्यांनी मान्य केलं. त्या दिवशी भोगी होती. मी आईला म्हटलं, 'नुसती भाकरी करून कसं चालेल? दुसरं काही तरी करू.' भीमसेनजी आले. आईला वाकून नमस्कार करीत म्हणाले, 'मला भाकरीच हवी बरं का?' तीळ लावलेली भाकरी त्यांनी आवडीनं खाल्ली. त्यांच्या वागण्यातला साधेपणा मी नेहमीच अनुभवला आहे.
माझ्या रचनांचं पुस्तक 'स्वरांगिनी' प्रसिद्ध करायचं चाललं होतं. भीमसेनजींनी त्याला प्रस्तावना लिहावी, अशी प्रकाशकांची आणि माझीही इच्छा होती. त्यांनी आनंदानं मान्य केलं. भीमसेनजींची प्रस्तावना हे या पुस्तकाचं विशेष आकर्षण ठरलं आहे.
गात रहावं...
माझे गुरू सुरेशबाबू, हिराबाई यांच्या स्मरणार्थ गेली पाच वर्षे इथे मी एक मोठा संगीत महोत्सव करते आहे. या उत्सवाला भीमसेनजी आवर्जून येतात. त्यामुळे उत्सवाची शान निश्चितच वाढते. माझे दोन्ही गुरू गेल्यानंतर किराणा घराण्यातील ज्येष्ठ मंडळी- सरस्वतीबाई, गंगूबाई, फिरोज दस्तूर आणि भीमसेनजी - माझं कौतुक करण्यासाठी, मला आशीर्वाद, शुभेच्छा देण्यासाठी माझ्या पाठीशी आहेत, हे माझं किती भाग्य!
भीमसेनजींना ईश्वर उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य देवो आणि 'मिले सूर मेरा तुम्हारा' असं त्यांनी गात रहावं, गात रहावं आणि आम्ही ऐकत रहावं, ऐकत रहावं-
No comments:
Post a Comment