वाढत जाताना झाकीरना दिसली आहे.. या दोन्हीबद्दल सांगताहेत स्वत: उस्ताद!
अब्बाजींच्या बरसीचं हे बारावं वर्ष आहे. बारा र्वष कशी निघून गेली अजूनही कळत नाही. पहिल्यांदा केलेली बरसी अजूनही आठवतेय. त्यावेळी आपण हे केवळ पहिल्या वर्षीच करणार आहोत, असं डोक्यात होतं. त्यानंतर देवाच्या कृपेने मी जिवंत असलो, तर शंभरावे वर्ष दणक्यात करायचे ठरवले होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पहिल्याच वर्षी आम्हाला खूपच चांगला अनुभव आला. सुरांनी वेडावलेल्या हजारो लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. मला अजूनही आठवतं पहिल्या वर्षी एनसीपीएमध्ये आम्ही हा कार्यक्रम केला त्यावेळी सकाळी सकाळी सुरेश तळवलकर, नयन घोष, भाई गायतोंडे, अरविंद मुळगांवकर, असे एकापेक्षा एक दिग्गज तबलावादक आणि त्यांचे शिष्य अशा शंभर तालवादकांनी अब्बाजींना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा, किशोरीताई यांनी स्वरांचं झाड उभं केलं होतं. दुपारी अब्बाजींवर, तालवाद्यांवर असे वेगवेगळे माहितीपट दाखवले होते. आणि संध्याकाळी काळा घोडा परिसरात आम्ही सर्व कलाकारांनी एकत्र येत बहार उडवून दिली होती. त्या घटनेला आता बारा र्वष होतील, पण त्यावेळचा माहोल अजूनही मनात घर करून आहे.
ते र्वष सरल्यानंतर पुढल्या वर्षी असं काही करायचं आहे, हे डोक्यातच नव्हतं. पण नोव्हेंबरअखेरीस मला फोन यायला लागले. गेल्यावर्षीसारखं यावर्षीही तुम्ही काही करणार असाल, तर आम्हाला त्यात आमची कला सादर करायला आवडेल, असं अनेक कलाकारांनी समोरूनच सांगितलं आणि त्यावर्षीही आम्ही षण्मुखानंद सभागृहात अब्बाजींची बरसी केली. तेव्हापासून सूर-तालाचा हा सिलसिला चालूच आहे.
अब्बाजींच्या बरसीचा विचार केला की, मला एक मैफल राहून राहून आठवते. ती मैफल आजही माझ्या मनात ताजीतवानी आहे. १९८३-८४च्या सुमाराची गोष्ट आहे. त्यावेळी मैफिलींना वेळेची मर्यादा नव्हती. त्यामुळे रात्रभर कलाकार आणि रसिकांचं हितगूज चालायचं. मला आठवतंय सेंट झेविअर्स महाविद्यालयात पंडित रविशंकरजींची मैफल होती. त्या मैफिलीला अब्बाजी संगत करणार होते. पण आयत्यावेळी त्यांनी मला तबल्यावर बसवलं आणि स्वत प्रेक्षकांमध्ये अगदी पुढल्या रांगेत जाऊन बसले.
रविजींनी सुरुवात केली, त्यावेळी उत्तररात्रीचे तीन वाजले होते. हळूहळू रंग भरायला सुरुवात झाली आणि पहाटेच्या सुमारास पहिला तुकडा संपवत असताना एक माणूस लगबगीने अब्बाजींजवळ गेला आणि त्याने त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. अब्बाजी आपल्या खुर्चीवर ताड्कन उडाले. त्यांनी इकडेतिकडे पाहण्यास सुरुवात केली. तो माणूस सूत्रसंचालकाच्या जवळ गेला आणि त्याने त्याच्याही कानात काहीतरी सांगितलं. सूत्रसंचालकही एकदम ‘सावधान’ झाला. मंचावरून हे सगळं पाहताना, नेमकं काय घडलं असावं, हा विचार सतत डोक्यात येत होता. पहिला तुकडा संपल्यानंतर निवेदक रविजींकडे आला आणि त्यांच्याही कानात तीच गोष्ट सांगितली. रविजींनी आपले डोळे मोठे करत एक छानसं हास्य केलं. आपल्या हातात माईक घेत त्यांनी संपूर्ण मैफिलीला ती बातमी ऐकवली. ते म्हणाले, ‘आजची वर्तमानपत्रं नुकतीच आली आहेत आणि त्यातील बातमीनुसार उस्ताद झाकीर हुसेन’, विचार करा, रविजींनी पहिल्यांदा मला उस्ताद म्हटलं होतं, ‘उस्ताद झाकीर हुसेन यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.’
मला काही सुचतच नव्हतं. मी अब्बाजींकडे पाहिलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. अब्बाजी धावतच स्टेजवर आले आणि मला मिठी मारली. त्यांनी स्वत मला हार घालून माझा सत्कार केला. त्या मैफिलीत संगीत किंवा माझं वाजवणं तसं दुय्यमच होतं. पण ती मैफल माझ्या मनात ताजीतवानी राहिली आहे, ती अब्बाजींच्या किंवा माझ्या गुरूंच्या चेहऱ्यावरील समाधानामुळे! आपल्या शिष्याने, मुलाने आपल्याला गुरुदक्षिणाच दिली आहे, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. ही मैफल, तिच्या आठवणी मी माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे.
अब्बाजींच्या बरसीच्या निमित्ताने मला या मैफिलीची नेहमीच आठवण होते. हा कार्यक्रम म्हणजे माझ्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यापेक्षाही आम्ही संगीतकारांनी एकत्र येऊन संगीताचे मानलेले आभार आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत या एका गोष्टीशी आमची नाळ जोडलेली आहे.
खूप आधीपासूनच राजकारण आणि धर्म यावरून सतत झगडा सुरू असतो. पण हा झगडा थांबवण्यासाठी संगीतासारखे प्रभावी माध्यम नाही. तांडवच्या ‘ता’मधून आणि लास्यच्या ‘ल’मधून ताल साकारला. भगवान शंकराच्या डमरूचा आवाज श्री गणेशाने बोलात मांडला तो तबला! अब्बाजी नेहमी म्हणत की मी सरस्वतीचा पुजारी आहे. यात धर्माचा काहीच भाग नाही. धर्माचा विचार केला, तर ते सहिष्णू मुसलमान होते. पण संगीत ही त्यांची पूजा होती. आमच्यात एक रिवाज असतो. बाळाला जन्मानंतर घरी आणतात तेव्हा वडील बाळाच्या कानात अजान देतात. मला अब्बाजींनी जवळ घेऊन माझ्या कानात तबल्याचे बोल वाचले होते. माझी अम्मी नाराज झाली, त्यावेळी अब्बाजींनी तिची समजूत काढताना तिला सांगितले होते की, ‘तबल्याचे बोल हीच माझी अजान आहे.’ त्यामुळे आम्हा कलाकारांसाठी संगीतच एक धर्म आहे.
आयुष्यभर मी तबल्याचा प्रचार केला. पण प्रचार करावा, म्हणून कधीच तबला वाजवला नाही. तबल्यावर प्रेम होते म्हणूनच ते झाले. आज जगभरात एवढा मानसन्मान मिळतो तेव्हा या तबल्याचे आणि संगीताचे केवढे आभार मानावेत, हेदेखील कळत नाही. पण आज विजय घाटे, रामदास पळसुले, योगेश शमसी, सत्यजित तळवलकर, केदार पंडित, सावनी तळवलकर, आदित्य कल्याणपूर, अनुराधा पाल, प्रफुल्ल आठले, शुभंकर बॅनर्जी, अनिंदो चतर्जी, राशिद मुस्तफा, अक्रम खान असे एकापेक्षा एक सरस तबलावादक ऐकले की तरुण झाल्यासारखे वाटते. माझ्या मते भारतीय शास्त्रीय संगीताचा सुवर्णकाळ आता सुरू आहे. आपल्याकडे जयतीर्थ मेवुंडी, आरती अंकलीकर, अश्विनी भिडे, श्रुती सडोलीकर, राहुल देशपांडे, महेश काळे असे एकापेक्षा एक सरस कलाकार आहेत.
माझ्या मते, शास्त्रीय संगीताची ही बेंचस्ट्रेंथ आपल्या क्रिकेट टीमच्या बेंचस्ट्रेंथपेक्षाही चांगली आहे. पूर्वी काही मोजकीच नावे होती. पण आजच्या तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. त्याचबरोबर इंटरनेट, यू-टय़ुबमुळे संगीताच्या माहितीचे मोठे ज्ञानभांडार त्यांना खुले झाले आहे. याचा वापर ते उत्तमरीत्या करतात. त्यामुळे आजच्या १५ वर्षांच्या कलाकाराच्या जाणिवा आणि मी १५ वर्षांचा असतानाच्या माझ्या जाणिवा यात महद्अंतर आहे. त्याशिवाय त्यांच्यापैकी कोणी माझ्याबरोबर वाजवायला बसतो त्यावेळी माझा तीस वर्षांचा अनुभव हा त्यांच्या गाठीशी आधीच असतो. त्यात ते त्यांच्या अनुभवांची भर घालत असतात. संगीताचा हा नंदादीप असाच तेवत राहो..
याउपर काय बोलणार!